ठळक बातम्या

    उल्हासनगरमध्ये ४० लाखांची जबरी चोरी; ठाणे शहर गुन्हे शाखेची २४ तासांत मोठी कारवाई, सहा आरोपी अटकेत ३६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

    उल्हासनगरमध्ये ४० लाखांची जबरी चोरी; ठाणे शहर गुन्हे शाखेची २४ तासांत मोठी कारवाई, सहा आरोपी अटकेत ३६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

     

    बँकेत ४० लाख रुपये भरण्यासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवून

    मारहाण; दोन मोटारसायकलींवरून आलेल्या आरोपींनी रोकड असलेली बॅग हिसकावली.

     

    उल्हासनगर परिसरात बँकेत ४० लाख रुपये भरण्यासाठी जात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील रोकड जबरीने हिसकावून नेल्याच्या गंभीर गुन्ह्याचा ठाणे शहर गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३६ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.१५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.०५ वाजता उल्हासनगर येथील क्रांती फूड एजन्सीचे दोन कर्मचारी एजन्सीचे सुमारे ४० लाख रुपये बँक ऑफ बडोदा, कल्याण पश्चिम शाखेत जमा करण्यासाठी जात होते. ते सहजानंद चौकाकडून लालचौकीच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या दोन मोटारसायकलींवरील चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला.आरोपींनी कर्मचाऱ्यांच्या स्कुटीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे असलेली सुमारे ४० लाख रुपयांची बॅग जबरीने हिसकावून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

    या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती मिळवून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार या कारवाईत समीर अख्तर शेख, आफताब अरशद खान, शहानवाज गफार हसन अन्सारी, सैफ युनूस शेख, मुशाहिद अन्वर खान आणि शाहिद इसहाक शेख या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह एकूण ३६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरित रकमेबाबत तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या कारवाईत ठाणे शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. पोलिसांच्या तपासामुळे गंभीर स्वरूपाचा जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणण्यात यश आले, अशी माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येते का, याकडेही पोलिसांचे लक्ष आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *