पालघरमध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट जनजागृती अभियान; नगरसेवक राहुल प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने वाहनचालकांना रस्ता सुरक्षेचा संदेश..
पालघर, 21 सप्टेंबर 2026 | पालघर
प्रतिनिधी — जावेद लुलानिया.
पालघर शहरात सातत्याने होत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालक आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने 20 सप्टेंबर 2026 रोजी आंबेडकर चौक, गणेश कुंडजवळ, पालघर येथे दुचाकी वाहनचालकांसाठी ‘हेल्मेट वापरा व रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम’ आयोजित करण्यात आला.हा जनजागृती उपक्रम नगरसेवक राहुल प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने आणि पालघर जिल्हा वाहतूक शाखेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. यावेळी दुचाकी वाहनचालकांना हेल्मेटच्या महत्त्वाबाबत माहिती देण्यात आली तसेच वाहन चालवताना नियमितपणे हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमातून नागरिकांना हेल्मेट हा केवळ वाहतूक नियम नसून जीवनाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असा संदेश देण्यात आला. रस्त्यावर झालेली छोटीशी चूकदेखील एखाद्या कुटुंबासाठी आयुष्यभराचे दुःख ठरू शकते. कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाचे वडील किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती रस्ता अपघातात गेल्यानंतर त्याचे दुःख संपूर्ण कुटुंबाला सहन करावे लागते.रस्ता सुरक्षेसाठी केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी पुरेशी नाही, तर नागरिकांचे सहकार्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य केल्यास अपघात रोखण्यासाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते.यासोबतच पालघर नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) देखील शहरातील रस्त्यांच्या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी खराब रस्ते, खड्डे आणि रस्त्यांशी संबंधित इतर समस्या वाहनचालकांसाठी धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कारण प्रश्न केवळ हेल्मेट घालण्याचा नाही, तर सुरक्षित रस्ता आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचाही आहे. रस्ते चांगले आणि सुरक्षित असतील, वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करतील आणि प्रशासन आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेल, तर पालघर शहरातील रस्ता अपघात कमी करण्याच्या दिशेने प्रभावी पावले उचलता येतील.अशा प्रकारचे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम सातत्याने आयोजित होणे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे.



