जव्हार : पतंगशाह कुटीर रुग्णालयात ४५ मिनिटे अंधार; सलाईनसाठी बॅटरीच्या प्रकाशाचा आधार!वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची गैरसोय; पर्यायी वीजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
जव्हार |
प्रतिनिधी — गणेश कलीगडा
जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयात शुक्रवारी रात्री सुमारे ११.२५ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. वीजपुरवठा खंडित होऊन सुमारे ४५ मिनिटे उलटूनही वीज पूर्ववत न झाल्याने रुग्णालयातील काही भागात अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते.उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अंधारातच रुग्णांची काळजी घ्यावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, एका रुग्णाला लावण्यात आलेल्या सलाईनच्या बाटलीकडे पाहण्यासाठी बॅटरीच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागत असल्याचेही दिसून आले.वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था कुठे?
रुग्णालय हे अत्यावश्यक आरोग्यसेवा देणारे ठिकाण असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी वीजव्यवस्था तत्काळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र वीज गेल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनाच प्रकाशाची व्यवस्था करावी लागत असल्याने रुग्णालयातील वीज व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.पतंगशाह कुटीर रुग्णालयातील वीजपुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे खंडित झाला? रुग्णालयात जनरेटर अथवा अन्य पर्यायी वीजव्यवस्था उपलब्ध आहे का? उपलब्ध असल्यास ती तातडीने कार्यान्वित करण्यात आली का? तसेच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोणती कार्यवाही केली, याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे.

रुग्णालय प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण, पर्यायी वीजव्यवस्था आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत प्रशासनाची बाजू जाणून घेणे महत्त्वाचे आहे.अत्यावश्यक आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयात रुग्णांना अंधारात राहण्याची वेळ येत असेल आणि सलाईनच्या बा
टलीसाठी बॅटरीच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागत असेल, तर रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी वीजव्यवस्था कितपत सक्षम आहे, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
गणेश कलीगडा सहसंपादक , पालघर नागरिक
जव्हार



