पालघर : बोईसरमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड; तांत्रिक तपासातून ३ आरोपी अटकेत लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला; स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांची संयुक्त कारवाई, हातोडा व मोटारसायकल जप्त
पालघर |

बोईसर पूर्व परिसरात झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि बोईसर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत उलगडा केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला लोखंडी हातोडा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बोईसर पूर्व येथील दांडिपाडा परिसरात फिर्यादी हर्षनाथ ब्रह्मदेव तिवारी यांच्या सँडविच काऊंटरवर तीन जण आले. काही महिन्यांपूर्वी कपड्याचे दुकान लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यापैकी एका आरोपीने लोखंडी हातोड्याने डोके, डावा गाल आणि डाव्या कानावर वार करून गंभीर दुखापत केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलीस ठाण्याची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनिलकुमार जादुगर पहलवान (२८), हिमांशु राजेशकुमार मिश्रा (२६) आणि शुभम माताचरण दुबे (३०) या तिघांना ताब्यात घेतले. तिघेही गणेशनगर, बोईसर येथे राहत असून मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.तपासादरम्यान संबंधित गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.
हातोडा आणि मोटारसायकल जप्त गुन्हा करताना वापरण्यात आलेला लोखंडी हातोडा आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, बोईसर पोलीस ठाणे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांनी केली.
पालघर नागरिक. 8806247860.



