पालघर नागरिक | विशेष बातमी
पत्र, पाठपुरावा आणि प्रशासनाची कारवाई; पालघर PWD व बोईसर MIDC कडून रस्ते दुरुस्तीला वेग
पालघर | ३१ जुलै २०२६


भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी पालघर–मनोर रोड तसेच बोईसर परिसरातील धोकादायक खड्ड्यांबाबत प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत संबंधित विभागांना निवेदने देण्यात आली होती आणि १ ऑगस्ट रोजी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.




यानंतर पालघर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच बोईसर MIDC प्रशासनाला आवश्यक पत्रव्यवहार करून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही विभागांकडून विविध ठिकाणी खड्डे बुजविण्याचे आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) कार्यालयामार्फत देखील पत्राद्वारे कार्यवाहीबाबत आश्वासन देण्यात आले असून, प्रशासनाने सुरू केलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जात आहे.
जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी सांगितले की,
“आम्ही १ ऑगस्ट रोजी पालघर आणि बोईसर या दोन्ही भागातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत. जर केलेली दुरुस्ती समाधानकारक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असल्याचे आढळले, तर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा नियोजित कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, जर दुरुस्ती निकृष्ट दर्जाची ठरली किंवा पुन्हा खड्डे निर्माण झाले, तर जनहितासाठी आमचे आंदोलन पुन्हा सुरू राहील.”
यावेळी त्यांनी पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाचे, सर्व पत्रकार बंधू-भगिनींचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे तसेच भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.शेवटी त्यांनी स्पष्ट केले की,”आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा विभागाविरुद्ध नसून, जनतेच्या सुरक्षिततेसाठी आहे. प्रशासनाने चांगले काम केले तर आम्ही त्यांचे स्वागत करू; परंतु नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाविरुद्ध आमचा आवाज भविष्यातही कायम राहील.”
“रस्ता सुरक्षित असेल तर जीवन सुरक्षित राहील.”
जनहितासाठी संघर्ष, जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न.



