ठळक बातम्या

प्रशासन जागे होणार की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार?

PN24 NEWS | विशेष वृत्त

दिनांक : 30 जुलै 2026 | पालघर

प्रशासन जागे होणार की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार?

 

पालघर–मनोर रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात १ ऑगस्ट रोजी ‘खड्ड्यात वृक्षारोपण’ आंदोलन; पालघरकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

पालघर | प्रतिनिधी अर्पिता तिवारी.

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) ला जोडणाऱ्या पालघर–मनोर मार्गावरील चाहाडे नाका–कोकणेरा–नागझरी–बोईसर या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, रिक्षाचालक, एस.टी. बस, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मालवाहतूक वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित प्रशासनाकडून या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या गंभीर प्रश्नाबाबत नवभारतीय शिव वाहतूक संघटना तसेच PN24 NEWS – पालघर नागरिक यांच्या माध्यमातून सातत्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, आरटीओ तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही आणि या रस्त्यावर अपघात घडून एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेला, तर त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित विभागाची राहील.याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पालघर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान पालघर–मनोर रोडवरील ज्या-ज्या ठिकाणी जीवघेणे खड्डे आढळतील, त्या त्या खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू केल्यास आंदोलन मागे घेण्याची तयारी असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिक, वाहनचालक, रिक्षाचालक, डम्पर चालक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “हा प्रश्न एका व्यक्तीचा किंवा एका संघटनेचा नसून संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे. प्रशासनाला जागे करणे ही लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. पालघर शहरातील रेल्वे उड्डाणपुलावरही मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांना जोराचे धक्के बसत आहेत. या पुलाबाबत अनेकदा तक्रारी करूनही अद्याप प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बोईसर MIDC ते चिल्लर फाटा हा रस्ताही अत्यंत खराब अवस्थेत असून औद्योगिक वाहतूक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील दुरुस्तीही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने असा इशाराही दिला आहे की, ज्या कंत्राटदाराने संबंधित रस्त्याचे काम केले असून दुरुस्तीसाठी निधी मिळूनही आवश्यक दुरुस्ती केली जात नसेल, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी. निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, तर संबंधित विभागांनी जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पालघर येथून सुरू होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन “सुरक्षित रस्ते हा आमचा हक्क आहे” हा आवाज बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

PN24 NEWS | पालघर नागरिक | विशेष वृत्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *