ठळक बातम्या

पालघर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जाणारा सुमारे ₹४७.१३ लाखांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाला जप्त, दोन आरोपी अटकेत

पालघर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जाणारा सुमारे ₹४७.१३ लाखांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाला जप्त, दोन आरोपी अटकेत

पालघर, दि. ३० (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा पोलीस दलाने अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जाणारा सुमारे ₹४७,१३,३६९ किमतीचा प्रतिबंधित केशरयुक्त पान मसाला जप्त केला. या कारवाईत पान मसाल्यासह ₹२० लाख किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ₹६७,१३,३६९ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली.

पोलीस प्रसिद्धीपत्रकानुसार, २९ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, MH-04/LY-5891 क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाल्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित केशरयुक्त पान मसाला आढळून आला. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करून वाहन ताब्यात घेतले.

या प्रकरणी संजयकुमार रजवंत केवट (वय ४२, रा. भिवंडी) व मोहम्मद इशारक अहमद मोहम्मद शमीम अन्सारी (वय २८, सध्या रा. भिवंडी, मूळ उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड, पोउपनि. अमोल चिंधे, पोहवा. संदीप चौधरी, पोना. सचिन आढाव, पोशि. परशराम घाटाळ, पोअं. राहुल क्षत्रीय, पोअं. विशाल लोहार तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

पालघर जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थ, अमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, जिल्ह्यात कायद्याचा धाक अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *