पालघर :: नशामुक्त समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा; पालघर नागरिक आणि नव भारतीय शिव वाहतूक संघटना
कुलकर्णींच्या उपोषणाच्या समर्थनार्थ गुटखा, तंबाखू, गांजा, गर्दा व इतर नशेच्या पदार्थांविरोधातील आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा.
पालघर जिल्ह्यात गुटखा, तंबाखू तसेच गांजा, गर्दा आणि इतर नशेच्या पदार्थांच्या कथित अवैध व्यवहाराविरोधात जीवनधारा शक्ती संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. प्रिया श. कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक पालघर नागरिक यांच्या वतीने सौ. प्रिया श. कुलकर्णी यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणारे पत्र देण्यात आले आहे. पत्रामध्ये समाजातील वाढती नशेची समस्या, विशेषतः युवा पिढीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, नशामुक्त समाजासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.पत्रामध्ये पालघर शहरातील गांधीनगर परिसरातील नशेच्या कथित अवैध व्यवहाराबाबत यापूर्वी प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिनांक २३/०४/२०२६, ३१/०८/२०२६ आणि २३/०९/२०२६ रोजी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दिल्याचा उल्लेख असून, संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

तसेच केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता नशेच्या पदार्थांचा मुख्य स्रोत, वितरक आणि संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचाही जाहीर पाठिंबायाचप्रमाणे भाजप प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हा यांच्या वतीनेही सौ. प्रिया श. कुलकर्णी यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.संघटनेच्या पत्रामध्ये गुटखा, तंबाखू, गांजा, गर्दा आणि इतर नशेच्या पदार्थांच्या कथित अवैध व्यवहाराविरोधात सुरू असलेल्या सामाजिक आंदोलनाचे समर्थन करण्यात आले आहे. विशेषतः तरुण पिढीला नशेपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती आणि सामाजिक प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट
दरम्यान, उपोषणस्थळी भेट देऊन सौ. प्रिया श. कुलकर्णी यांना निवेदनाच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला. नशेच्या समस्येबाबत प्रशासनाने तक्रारींची गंभीर दखल घेऊन कायदेशीर चौकशी करावी, अशी भूमिका समर्थकांकडून मांडण्यात आली.या आंदोलनाला पुढील काळात आणखी कोणत्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा पाठिंबा मिळतो, तसेच प्रशासनाकडून या तक्रारींबाबत कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता पालघरकरांचे लक्ष लागले आहे.



