मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रालय येथे घेण्यात आला.
पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. यादृष्टीने पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत त्वरित उपलब्ध करून देतानाच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा प्राधान्याने पूर्ववत कराव्यात. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार राजेंदें गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार विनोद निकोले, आमदार विकास तरे, आमदार राजन नाईक,मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



