ठळक बातम्या

    पालघर शहरातील रस्ते बनले धोकादायक; मोकाट जनावरे, बेशिस्त पार्किंग आणि रिक्षांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी! देवीचा रोड, कचेरी रोड, जुना पालघर-मनोर रोडवर नागरिक त्रस्त; वारंवार लेखी तक्रारी करूनही कारवाई शून्य.

    पालघर शहरातील रस्ते बनले धोकादायक; मोकाट जनावरे, बेशिस्त पार्किंग आणि रिक्षांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी! देवीसा रोड, कचेरी रोड, जुना पालघर-मनोर रोडवर नागरिक त्रस्त; वारंवार लेखी तक्रारी करूनही कारवाई शून्य.

     

    पालघर | दि. 12 सप्टेंबर 2026

    रिपोर्टर – अर्पिता तिवारी

     

    पालघर शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वर्दळ वाढत असताना रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील देवीचा रोड, कचेरी रोड तसेच जुना पालघर-मनोर रोड परिसरात मोकाट गायी-बैल, घोडे, बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर उभी राहणारी वाहने आणि मालवाहू वाहनांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    रस्त्यावर मोकाट जनावरे; अपघाताचा धोका.

     

    शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर गायी-बैल तसेच घोडे मोकाट फिरताना आणि रस्त्यावरच बसताना दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अचानक मार्ग बदलावा लागत असून दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती विशेषतः धोकादायक ठरत आहे.गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची आणि नागरिकांची संख्या आणखी वाढणार असल्याने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.यापूर्वी प्रशासनाकडे मोकाट जनावरांबाबत निवेदने व तक्रारी करण्यात आल्या असून, जनावरे पकडून संबंधित गोशाळा अथवा संस्थेकडे देण्याची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली होती. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावरील परिस्थितीत फारसा फरक दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

    बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते अरुंद

    पालघर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि इतर वाहने उभी केली जातात. परिणामी वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ता कमी होतो आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी निर्माण होते.पार्किंगसाठी योग्य व्यवस्था आणि अनधिकृत पार्किंगवर नियमित कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

     

    मनोर रोडवरील मारुती धाम परिसरात रिक्षांची समस्या

    पालघर-मनोर रोडवरील मारुती धाम परिसरात रिक्षा रस्त्यावर उभ्या केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही रिक्षाचालकांकडून रस्त्यावरच वाहन उभे करून प्रवासी घेणे-उतरणे सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होते.या ठिकाणी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही नागरिकांनी रिक्षाचालकांकडून दादागिरीसारखी वर्तणूक होत असल्याच्या तक्रारीही मांडल्या आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासणे आवश्यक आहे.

    PWD आणि नगरपरिषद नेमकी जबाबदारी कोणाची?

    पालघर शहरातील सर्वच रस्ते एकाच विभागाच्या अखत्यारित नसून काही रस्ते PWDच्या तर काही रस्ते नगरपरिषदेच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचा विषय आला की जबाबदारी एकमेकांकडे ढकलली जात असल्याची नागरिकांची भावना आहे.

    मात्र नागरिकांचा साधा प्रश्न आहे

    “रस्ता कोणाच्या अखत्यारित आहे हे प्रशासनाने ठरवावे; पण रस्ता सुरक्षित करून देण्याची जबाबदारी कोण घेणार?”गणेशोत्सवापूर्वी शहरातील खराब रस्त्यांची पाहणी करून तातडीने आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

    मालवाहू वाहनांसाठी वेळेचे नियम; अंमलबजावणी कुठे?

    पालघर शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता मालवाहू वाहनांना गर्दीच्या वेळेत रस्त्यावर माल चढवणे-उतरणे टाळण्यासाठी वेळेचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मालवाहू वाहने रस्त्यावर उभी राहिल्यास वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे संबंधित नियमांची वाहतूक पोलीस आणि नगरपरिषद यांनी संयुक्तपणे काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    सार्वजनिक बैठकीनंतरही कारवाई शून्य?

    मोकाट जनावरे, वाहतूक, पार्किंग आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत सार्वजनिक बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वारंवार लेखी तक्रारीही करण्यात आल्या आहेत. तरीही प्रत्यक्ष कारवाई अपेक्षित प्रमाणात दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.गणेशोत्सवाच्या आधी प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

    पालघरकरांचे प्रशासनाला थेट प्रश्न मोकाट जनावरांवर कारवाई कधी?

    रस्त्यावर जनावरे सोडणाऱ्या मालकांवर काय कारवाई?

    बेशिस्त पार्किंगवर नियमित कारवाई का नाही?

    मारुती धाम परिसरातील रिक्षांची रस्त्यावरील पार्किंग कधी हटणार?

    PWD आणि नगरपरिषद यांच्या अखत्यारितील रस्त्यांची दुरुस्ती कधी पूर्ण होणार?

    मालवाहू वाहनांच्या वेळेच्या नियमांची अंमलबजावणी कोण करणार?

    गणेशोत्सवापूर्वी पालघर शहराची वाहतूक व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची ठोस कृती योजना काय आहे?

    वारंवार लेखी तक्रारी करूनही कारवाई शून्य!

    नव भारतीय शिव वाहतूक सेना पालघर जिल्हाध्यक्ष

    जावेद लुलानिया. पालघर

    पालघर नागरिक विशेष रिपोर्ट जनतेचा प्रश्न — प्रशासनाचे उत्तर आवश्यक!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *