ठळक बातम्या

    पालघर :: गुटखा, अमली पदार्थांच्या कथित विक्रीविरोधात प्रिया कुलकर्णी यांचे आमरण उपोषण;

    पालघर :: गुटखा, अमली पदार्थांच्या कथित विक्रीविरोधात प्रिया कुलकर्णी यांचे आमरण उपोषण;

     

    29 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

    मुख्य पुरवठादार, होलसेल विक्रेते आणि संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करण्याची मागणी

    पालघर | 28 सप्टेंबर 2026

    पालघर जिल्ह्यात गुटखा, पान मसाला, मिश्रित तंबाखू तसेच गांजा, चरस, ब्राऊन शुगर, गावठी दारू आणि इतर अमली पदार्थांच्या कथित अवैध विक्री, साठवणूक व वाहतुकीच्या प्रश्नावरून जीवनधारा शक्ती संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. प्रिया श. कुलकर्णी यांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचे निवेदन दिले आहे. या प्रश्नावर ठोस आणि कायदेशीर कारवाई होत नाही, असा दावा करत त्यांनी 29 सप्टेंबर 2026 पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.कुलकर्णी यांनी यापूर्वी 8 सप्टेंबर 2026 रोजी पालघर पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिल्याचा संदर्भ आपल्या नव्या पत्रात दिला आहे. गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ हा केवळ एका पदार्थाचा प्रश्न नसून, गांजा, चरस, ब्राऊन शुगर, गावठी दारू आणि इतर अमली पदार्थांच्या कथित विक्री-वितरणामुळे तरुण पिढी, विद्यार्थी आणि नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

    “फक्त किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई नको; संपूर्ण पुरवठा साखळी तपासा”

    प्रशासनाने केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता मुख्य पुरवठादार, होलसेल विक्रेते, वितरक, वाहतूक करणारे व्यक्ती आणि संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच परराज्यातून प्रतिबंधित पदार्थ पालघर जिल्ह्यात कशा पद्धतीने येतात, त्यांची वाहतूक कोण करते आणि त्यामागील नेटवर्क कोणते आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.पालघर रेल्वे स्थानकाबाबतही चौकशीची मागणी परराज्यातून येणाऱ्या प्रतिबंधित पदार्थांची रस्ते किंवा रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक, तसेच पालघर रेल्वे स्थानकावर माल उतरवणे अथवा स्थानांतरित करण्याबाबत संबंधित पोलीस, GRP, RPF आणि रेल्वे प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

    29 सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण

    निवेदनात नमूद केल्यानुसार, 29 सप्टेंबर 2026 पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. संबंधित विभागांकडून ठोस आणि कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर, पालघर नगरपरिषद मुख्याधिकारी, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर पोलीस ठाणे, GRP, RPF, पालघर रेल्वे स्थानक प्रशासन, FDA, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्याचे पत्रातून दिसून येते.आता या गंभीर तक्रारींची संबंधित यंत्रणा कशाप्रकारे दखल घेते आणि प्रत्यक्षात कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

     

    पालघर नागरिक अपडेट

    जनतेच्या प्रश्नांवर लक्ष — प्रशासनाला थेट सवाल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *