सेवा संकल्प अभियानांतर्गत हिरडपाडा आश्रमशाळेत भव्य आरोग्य शिबिर
११०० विद्यार्थी व २०० पालक-ग्रामस्थांची आरोग्य तपासणी; शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण व जनजागृतीच्या विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला रंगत
जव्हार, जि. पालघर :
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था, जामसर संचलित एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, हिरडपाडा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत लायन्स क्लब ऑफ जुहू, लिओ क्लब ऑफ जुहू व रोटरॅक्ट क्लब ऑफ मेडिक्रू यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडले.आरोग्य शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश श्रीकृष्ण उदावंत व झेनिया मिस्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ मेडिक्रूचे श्री. मयुरेश पाटील व जाई टोटे उपस्थित होते.या आरोग्य शिबिरात शाळेतील जवळपास ११०० विद्यार्थी तसेच सुमारे २०० पालक व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसोबत विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली, स्वच्छता, पोषण आणि आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन. शिबिरामध्ये किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीचे आरोग्य व स्वच्छता या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक बाबी, वैयक्तिक स्वच्छता आणि योग्य काळजी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.तसेच व्यसनाधीनता, धूम्रपानमुक्ती, मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.डिजिटल शिक्षणाला चालना; शैक्षणिक सॉफ्टवेअरचे उद्घाटन
कार्यक्रमादरम्यान लिओ क्लब ऑफ जुहूचे अध्यक्ष लिओ हितांश दोशी यांच्या हस्ते शैक्षणिक सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.ग्रंथालयाचे उद्घाटन.लायन आशिष झवेरी तसेच,मच्छिंद्र गडाख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), प्रकल्प कार्यालय, जव्हार यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे.
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी केला.लेझीम व तारपा नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. ए. बी. दराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अभिनव पद्धतीने लेझीम पथकाचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक तारपा नृत्याने आदिवासी संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविले.
फन फेअरमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह.विद्यार्थ्यांसाठी विविध फन फेअर, गेम्स, मनोरंजक खेळ व नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमांचा मनमुराद आनंद लुटला.
संस्थाध्यक्षांकडून उपक्रमांचे कौतुक.यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय,दिलीप नारायण पटेकर यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच प्रकारे सातत्याने विविध उपक्रम राबविण्यासाठी संस्थेचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.तसेच लायन्स क्लब ऑफ जुहू, लिओ क्लब ऑफ जुहू आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ मेडिक्रू यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या यशाचा मुख्याध्यापकांनी मांडला आलेख
मुख्याध्यापक. गणेश श्रीकृष्ण उदावंत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा मांडला. आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण, व्यसनमुक्ती, किशोरवयीन मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन असे विविध उपक्रम एकाच दिवशी घेऊन शाळेच्या इतिहासात एक वेगळी नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच विद्यार्थ्यांसाठी बंक-बेड आणि अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता असून या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यवरांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास संस्थेच्या सचिव तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालिका,ज्योती दिलीप पटेकर, संस्था सदस्य तथा जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक नकुल दिलीप पटेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गंगा येशू माळी, दाढरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. सुभाष भोरे, अधिकारी, पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे अधीक्षक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. बी. नागरगोजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ,पी. जी. पाटील यांनी केले.सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य तपासणी, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण, संस्कृती, व्यसनमुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम हिरडपाडा आश्रमशाळेच्या इतिहासातील एक उल्लेखनीय व प्रेरणादायी उपक्रम ठरला.



