ठळक बातम्या

    आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश; निकणे-पिंपळशेत, वधना पुलांचे अखेर भूमिपूजन

    आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश; निकणे-पिंपळशेत, वधना पुलांचे अखेर भूमिपूजन

    डहाणू, दि. ५ ऑक्टोबर : डहाणू तालुक्यातील निकणे-पिंपळशेत परिसरातील ग्रामस्थांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला अखेर मूर्त रूप आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुप्रतीक्षित पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उत्साहात पार पडला. ग्रामस्थांनी सातत्याने केलेला पत्रव्यवहार, प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडलेला प्रश्न यामुळे अखेर या पुलाच्या कामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित यांच्या विशेष प्रयत्नांतून नाबार्डच्या माध्यमातून निकणे-पिंपळशेत पुलासाठी २५०.७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून सुमारे ५० मीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा नवीन पूल उभारण्यात येणार असून, तो सध्याच्या पुलापेक्षा सुमारे चार फूट उंच असणार आहे.

    यासोबतच वधना–निकणे पुलासाठी ३९६.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हा पूल ७० मीटर लांबीचा आणि सध्याच्या पुलापेक्षा तब्बल ९ ते १० फूट उंच बांधण्यात येणार आहे. दोन्ही पुलांना जोडण्यासाठी ४० मीटर आणि ४० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे निकणे, पिंपळशेत आणि वधना परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाला मोठी सोय होणार असून, पावसाळ्यात पूरस्थितीमुळे संपर्क तुटण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.या पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पुलासाठी वारंवार निवेदने देणे, संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करणे तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. अखेर या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने भूमिपूजन सोहळा पार पडला असून, ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे.भूमिपूजन कार्यक्रमावेळी ठेकेदार श्रेयश विकास पाटील यांनी पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून एक वर्षाच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता प्रत्यक्ष बांधकामाला वेग येण्याची अपेक्षा आहे.

     

    दरम्यान, विकासकामांमुळे परिसरातील जमिनीला भविष्यात महत्त्व प्राप्त होणार असल्याने आमदार राजेंद्र गावित यांनी ग्रामस्थांना जमीन जपून ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. जमीन ही भविष्यातील महत्त्वाची संपत्ती असून, ती घाईघाईने विक्री करू नये, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करताना पुलासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. अखेर पुलाच्या कामाला मंजुरी मिळून भूमिपूजन झाल्याबद्दल आमदार राजेंद्र गावित यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यातील दळणवळणाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळेल, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

     

    या भूमिपूजन सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नितीन पगारे, मनीष चकधरे, सरपंच सोनाली कोम, उपसरपंच सुदाम मेरे, अजय घाटाळ, दिलीप घोषे, सागर गुप्ता यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आता नजरा कामाच्या वेगाकडे वर्षानुवर्षांच्या मागणीनंतर पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंजूर आराखड्यानुसार काम दर्जेदार पद्धतीने आणि ठेकेदाराने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षभरात पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा, अशी अपेक्षा निकणे-पिंपळशेतसह परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *