पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज
पालघर हादरले! डॉक्टर मारहाणीनंतर आता वाड्यात ७१ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला; युवासेना पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
पालघर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पालघरमधील साईराम परिसरातील रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या बेदम मारहाणीची घटना ताजी असतानाच, आता वाडा तालुक्यात एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर अमानुष हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नवरात्रोत्सवाच्या तांदळाच्या हिशोबावरून ठाकरे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्याने आपल्याच चुलत आजोबांना स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याचा आरोप असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हॉस्पिटलमधील राडा ताजा असतानाच नवा प्रकार
काही दिवसांपूर्वी पालघरच्या साईराम येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची व अटकेची कारवाई झाली होती. ही घटना शांत होत नाही तोच आता वाडा शहरात ज्येष्ठ नागरिकावर झालेला हल्ला समोर आल्याने पालघरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणाचाही धाक उरला नाही का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नेमका वाद कशावरून पेटला?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दिलीप महेंद्र भानुशाली (वय ७१) हे सेवानिवृत्त असून शेती करतात. त्यांनी गावातील नवरात्री उत्सवासाठी मंडळाला तांदळाच्या ३ गोण्या दिल्या होत्या. मात्र मंडळाने जेवणासाठी दोनच गोण्या वापरल्या आणि एक गोणी बाजूला ठेवली. दिलीप भानुशाली यांनी शिल्लक राहिलेल्या एका गोणीबाबत मंडळाकडे विचारणा केली. याच साध्या कारणावरून वाद चिघळला आणि मंडळाशी संबंधित असलेल्या त्यांच्या चुलत नातवांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.रॉडने मारहाण, दागिन्यांचीही लूट झाल्याचा आरोप दिलीप भानुशाली यांनी वाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, युवासेनेचा वाडा शहर उपसचिव आणि शहरप्रमुख ओंकार भानुशाली आणि अजय भानुशाली यांनी त्यांना कानशिलात लगावून बाटली फेकून मारली. त्यानंतर त्यांना फरफटत नेत सुचक खानावळ परिसरात स्टीलच्या दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून शरीरावर मुका मार लागला आहे. तसेच या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील सोन्याचे कडेही गहाळ झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. वृद्धाच्या मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही फोनवरून अश्लील शिवीगाळ करण्यात आली.
पोलीस आणि पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष
सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड वेगाने पसरत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रिलीफ हॉस्पिटलमधील राड्यानंतर आता या प्रकरणात वाडा पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करून अटक करणार का? आणि ठाकरे गटाकडून संबंधित पदाधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाणार? याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



