ठळक बातम्या

​पालघरमध्ये तुकाराम मुंढेंच्या आदेशांना केराची टोपली? FDA आणि नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

पालघरमध्ये तुकाराम मुंढेंच्या आदेशांना केराची टोपली? FDA आणि नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

 

​विशेष वृत्त / पालघर:
राज्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, राज्याच्या इतर भागात कारवाईचा धडाका सुरू असताना पालघर जिल्ह्यात मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे. पालघरमधील अन्न व औषध प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाला आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीतून आणि कडक निर्देशांतून कोणतीही शिक मिळालेली नाही का? असा संतापजनक सवाल आता पालघरकर विचारत आहेत.
​रस्त्यांवर उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री; भेसळीचे मोठे जाळे ​पालघर शहरात मुख्य रस्ते, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. या खाद्यपदार्थांवर दिवसभर धूळ, कचरा आणि माशा बसत असल्याने नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शहरात हलक्या दर्जाचे आणि भेसळयुक्त (डुप्लिकेट) खाद्यतेल तसेच निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा सुळसुळाट झाला आहे. इतकेच नव्हे, तर एक्सपायरी डेट (मुदत संपलेले) निघून गेलेले पाकिटांमधील खाऊचे साहित्यही खुलेआम बाजारात खपवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.​मांस-मच्छी आणि कोंबड्यांच्या बेकायदेशीर दुकानांचा सुळसुळाट​पालघर नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यांदेखत रस्त्यांच्या कडेला आणि फूटपाथवर बकऱ्यांचे मटण, चिकन आणि मच्छी विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. स्वच्छता आणि आरोग्याचे कोणतेही नियम न पाळता अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरणात उघड्यावर मांस विकले जात आहे. रक्ताचे डबके, कचरा यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या वाढत्या दुकानांवर ना नगरपरिषदेचा अंकुश उरला आहे, ना अन्न व औषध प्रशासनाचा.

तुकाराम मुंढेंच्या निर्देशांची अंमलबजावणी कधी होणार?

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यात अन्न सुरक्षेबाबत अत्यंत कठोर नियम लागू केले असून, अन्नपदार्थ तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही पालघरचे अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत.प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे पालघरच्या जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, “स्थानिक अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढेंकडून कर्तव्यदक्षतेचे धडे घ्यावेत आणि त्यांनी दिलेल्या निर्देशांची पालघरमध्ये तत्काळ व कठोर अंमलबजावणी करावी,” अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे. आता तरी संबंधित प्रशासन जागे होऊन धडक कारवाई करणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *