ठळक बातम्या

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर आदर्श ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी व वनराई पुरस्कारांचे वितरण

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर आदर्श ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी व वनराई पुरस्कारांचे वितरण

 

पालघर दि ३० मार्च: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघर जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे उत्साहात पार पडला. यावेळी आमदार राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रुपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत,तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वनराई उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाच बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाला प्रतिसाद देत अनेक ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली. चहाडे ग्रामपंचायतीने सर्वाधिक १५ बंधारे उभारले, तर भाताणे, आडणे व बऱ्हाणपूर ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १२ बंधारे उभारून उल्लेखनीय कामगिरी केली. या उपक्रमांतर्गत एकूण ३८ ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

यासोबतच आदर्श ग्रामसेवक (सन २०२२-२३ व २०२३-२४) तसेच आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (सन २०२४-२५) पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गेल्या काही वर्षांतील प्रलंबित पुरस्कार आज वितरित करण्यात आल्याने संबंधितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

मोठा भाऊ म्हणून जिल्ह्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून, जिल्ह्यातील कोणताही नागरिक जात, धर्म किंवा पक्षभेद न पाहता वंचित राहू नये, सर्वांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वनराईसारख्या उपक्रमांमुळे जलसंधारणास चालना मिळून ग्रामीण विकास अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

राजेंद्र गावित यांनी आपल्या प्रतिपादनात ग्रामविकासासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासन यांचे समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितलेजिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी आपल्या मनोगतातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांमध्ये सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असून, शाश्वत विकासासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या प्रतिपादनात वनराई उपक्रमांतर्गत १००० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात ११२८ बंधारे उभारण्यात आल्याचे सांगितले. तसेच ‘निपुण पालघर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढीसाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करून इतर विकासकामांचा आढावा पालकमंत्र्यांसमोर सादर केला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते रविंद्र शिंदे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच रविंद्र शिंदे यांना निवृत्तीचे लाभ प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद यांनी मानले.

यावेळी जिल्हा परिषद तसेच ग्राम पंचायतचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *