ठळक बातम्या

पालघर पोलिसांची सायबर फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; झारखंडमधून आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम हस्तगत

पालघर पोलिसांची सायबर फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; झारखंडमधून आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम हस्तगत

 

पालघर | जावेद लुलानिया.

पालघर पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरोधात मोठी कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करून नागरिकाची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना झारखंड राज्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीत गेलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी परत हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पालघर पश्चिम येथील एका नागरिकाला अज्ञात व्यक्तीने पालघर जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप प्रोफाइल तयार करून संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख जिल्हाधिकारी म्हणून करून विश्वास संपादन केला आणि विविध कारणे सांगून ५० हजार रुपयांची मागणी केली. विश्वासात घेतल्यामुळे संबंधित नागरिकाने ही रक्कम पाठविली.नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे झारखंड राज्यातील धनबाद येथे कारवाई करत दोन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीतील ५० हजार रुपयांची संपूर्ण रक्कम हस्तगत केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सायबर गुन्हेगारांकडून शासकीय अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा इतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बनावट सोशल मीडिया व व्हॉट्सअॅप खाती तयार करून फसवणूक केली जात असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून पालघर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

📌 जनतेस आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाने पैसे मागितल्यास खात्री करूनच व्यवहार करावा. संशयास्पद कॉल, संदेश किंवा व्हॉट्सअॅप खात्याबाबत त्वरित पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा.

✍️ जावेद लुलानिया, पालघर

मुख्य संपादक – पालघर नागरिक

समाज सुधारायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आज गुन्हे, सायबर फसवणूक आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज आहे. जागरूक नागरिकच सुरक्षित समाजाची निर्मिती करू शकतो.”

पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज

“आम्ही नेहमी सत्य दाखविण्याचे धाडस करतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *