पालघर–मनोर रोडच्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे निवेदन; १ ऑगस्टपर्यंत दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलनाचा इशारा
पालघर | प्रतिनिधी अर्पिता तिवारी.
पालघर–मनोर रोडवरील चाहाडे नाका – कोकणेरा – नागझरी – बोईसर या मार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला गंभीर धोका लक्षात घेऊन भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हा यांच्या वतीने आज संबंधित शासकीय विभागांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.हे निवेदन जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पोलीस अधीक्षक, पालघर पोलीस, वाहतूक शाखा, एस.टी. विभाग तसेच संबंधित प्रशासनाला देण्यात आले असून, या मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी सांगितले की, पालघर–मनोर हा सिंगल रोड असून अनेक ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या बाजूची साईड पट्टीही खराब झाल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहनांना रस्त्याखाली उतरावे लागते. मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका, एस.टी. बस तसेच हजारो नागरिक प्रवास करतात. वारंवार निवेदने, बातम्या आणि पाठपुरावा करूनही अद्याप प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याबद्दल संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.निवेदनामध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, दि. १ ऑगस्ट २०२६ पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता पालघर–मनोर रोडवरील खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
यावेळी जावेद मजीद लुलानिया यांनी प्रशासनाला हात जोडून विनंती केली की, हे आंदोलन करण्याचा उद्देश संघर्ष निर्माण करणे नसून नागरिकांचे जीव वाचावेत आणि प्रशासनाने तातडीने जागे होऊन रस्त्याची दुरुस्ती करावी हा आहे. त्यामुळे संबंधित विभागाने विलंब न करता युद्धपातळीवर काम सुरू करून नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा.



