पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनवर FDA ची धडक कारवाई; मुदतबाह्य अन्नसाठा आढळल्याने परवाना तात्काळ निलंबित
पालघर | 27 जुलै 2026
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासन (FDA) ने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य (Expired) अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शुक्रवारपासून कॅन्टीन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
FDA च्या तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये साठवून ठेवलेल्या काही खाद्यपदार्थांची मुदत संपलेली असल्याचे तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत परवाना निलंबित केला.या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील अन्नसुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हीच प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भेसळयुक्त अन्न, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, बेकायदेशीर औषध विक्री, सौंदर्यप्रसाधने तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे.या कारवाईमुळे अन्न व्यवसायिकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, मुदतबाह्य अन्नसाठा किंवा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.
👉 नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही हॉटेल, कॅन्टीन किंवा खाद्यपदार्थ विक्री केंद्रात मुदतबाह्य किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री होत असल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी.
PN24 NEWS | पालघर नागरिक
“सत्य • निष्पक्ष • जनहित”



