पालघर चे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते ३४ दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांचे वाटप
पालघर तहसीलदार कार्यालयात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या ३४ दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. दिव्यांग नागरिकांना शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने पात्र लाभार्थ्यांची निवड करून हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिधापत्रिका वितरण कार्यक्रमात पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे, पुरवठा अधिकारी विजय बच्चे, नायब तहसीलदार गावित तसेच आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.अंत्योदय अन्न योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे धान्याचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबाला अन्नसुरक्षेचा आधार मिळतो. दिव्यांग नागरिकांसाठीही अशा योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
शिधापत्रिका मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभ घेता येणार असल्याने समाधान व्यक्त केले. पात्र असूनही विविध कारणांमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या दिव्यांग व गरजू नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.या उपक्रमामुळे पालघर तालुक्यातील ३४ दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासनाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.



