पालघर पोलिसांची मोठी कामगिरी; कोयता हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडत वाचवला जीव.
पालघर | जावेद लुलानिया.
पालघर शहरातील तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पालघर पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे आरोपी स्वतःचे जीवन संपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला सुरक्षित ताब्यात घेतले आणि त्याचा जीवही वाचवला.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटिल स्वतः व त्यांचे पथक तात्काळ तपासाला लागले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत, पोलीस उपनिरीक्षक वानखेडे, पोहेकॉ. कपिल नेमाडे, पोहेकॉ. नरेंद्र पाटील, पोहेकॉ. संशय धांगडा, पोहेकॉ. कल्याण केंगार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी पालघर पोलीस ठाण्यात दाखल केले.
गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करणे आणि त्याचवेळी एका व्यक्तीचा जीव वाचवणे ही पालघर पोलिसांची दुहेरी यशस्वी कामगिरी मानली जात आहे. या कारवाईमुळे पालघर पोलिसांच्या सतर्कता, कार्यक्षमता आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.”गुन्हेगाराला कायद्यापुढे उभे करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, तर मानवी जीवन वाचवणे ही त्यांची मानवतेची ओळख आहे. पालघर पोलिसांनी या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.”
“आम्ही नेहमी सत्य दाखविण्याचे धाडस करतो.”



