ठळक बातम्या

पालघर तालुका कृषी पतपुरवठा विकास सहकारी सेवा मतदारसंघातून अनिल गावड यांचा एका मताने थरारक विजय

पालघर तालुका कृषी पतपुरवठा विकास सहकारी सेवा मतदारसंघातून अनिल गावड यांचा एका मताने थरारक विजय

पालघर | 30 जून | प्रतिनिधी

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026-2031 या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत पालघर तालुका कृषी पतपुरवठा विकास सहकारी सेवा मतदारसंघातून अनिल मा. गावड यांनी अवघ्या एका मताने थरारक विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांच्या या विजयामुळे पालघर तालुक्यात, विशेषतः बंदरपट्टी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक वर्षांनंतर या भागाला बँकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. पालघर तालुका कृषी पतपुरवठा विकास सहकारी सेवा मतदारसंघात अनिल मा. गावड आणि नागेश ग. पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण 54 मतदार होते. त्यापैकी अनिल गावड यांना 27 मते, नागेश पाटील यांना 26 मते मिळाली, तर 1 मत अवैध ठरले. त्यामुळे अनिल गावड यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय संपादन केला.

या विजयामुळे अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्वाची प्रतीक्षा करणाऱ्या पालघर तालुक्यातील बंदरपट्टी भागाला पुन्हा एकदा सहकारी क्षेत्रात आपला आवाज मिळाला आहे. अनिल गावड यांच्या विजयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, सहकारी संस्था, शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विजयानंतर समर्थकांनी जल्लोष साजरा करत गुलाल उधळला आणि अनिल गावड यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. आगामी काळात सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आणि शेतकरी, सभासद व ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करू, असा विश्वास अनिल गावड यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विजयामुळे पालघर तालुक्याच्या सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *