ठळक बातम्या

    अतिवृष्टीने खराब झालेले रस्ते तातडीने खड्डेमुक्त करा आमदार विलास तरे.आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना.

    अतिवृष्टीने खराब झालेले रस्ते तातडीने खड्डेमुक्त करा आमदार विलास तरे.आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना.

    पालघर. (प्रतिनिधी) अर्पिता तिवारी.
    पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बोईसर विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचे गंभीर नुकसान झाल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार विलास तरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

    पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात आमदार विलास तरे यांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघातील रस्त्यांच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

    यावेळी आमदार तरे म्हणाले की, “सततच्या अतिवृष्टीमुळे पालघर व वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार तसेच वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागांनी विलंब न करता खड्डे बुजविण्याची व आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत.”रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये निधीअभावी विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून घेऊन कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही आमदार तरे यांनी संबंधित विभागांना दिल्या.बैठकीत भालीवली–आडणे–वडघर–कळभोण, सायवन (मेढाफाटा) ते मेढे, दुर्वेश ते आंबूर, चहाडे ते तांदुळवाडी, दुर्वेश ते सावरा तसेच चिंचारे ते रावते यांसह ग्रामीण भागातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

    दरम्यान, मतदारसंघातील अद्याप मुख्य रस्त्यांशी न जोडलेल्या पाड्यांना रस्त्याने जोडण्याच्या विषयावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. विस्तार अधिकारी संजय भोये यांच्याकडून याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता जागृती संखे यांच्यासमवेत चर्चा करून संबंधित पाड्यांना रस्त्याने जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता जागृती संखे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता श्रद्धा शेळके, तसेच संबंधित विभागांचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *