जिल्हा परिषद पालघर
अपघातांना आळा, गोवंशाला सुरक्षित निवारा; पालघर जिल्ह्यात विशेष मोहीम
मोकाट गायी-बैलांच्या मालकांना दोन दिवसांची मुदत; त्यानंतर गोवंश गोशाळेत सुपूर्द करणार
रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गोवंशामुळे होणारे अपघात रोखतानाच गोवंशाला सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी पालघर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रशासन, गोशाळा, गोरक्षक, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि सीएसआर संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार असून, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली गोरक्षक व गोशाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी भटक्या गोवंशाच्या मालकांना आवाहन केले की, ज्यांच्या मालकीच्या गायी, बैल अथवा अन्य गोवंश रस्त्यावर मोकाट फिरत आहेत, अशा मालकांनी आपली जनावरे दोन दिवसांत ताब्यात घ्यावीत. त्यानंतरही जनावरे रस्त्यावर मोकाट आढळल्यास प्रशासनामार्फत ती ताब्यात घेऊन गोशाळांकडे सुपूर्द करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी येत्या मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी रात्री विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेसाठी भटक्या गोवंशाची संख्या, त्यांना ठेवण्यासाठी आवश्यक जागा, गोशाळांची क्षमता, वाहतूक व्यवस्था आणि मनुष्यबळ यांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सीएसआर संस्था व स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार असून, पोलीस बंदोबस्तात जनावरांना वाहनांमध्ये भरून संबंधित गोशाळांकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले जाणार आहे.यावेळी आदी घंटाकर्ण चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी तसेच गोसेवक मनोज शहा, हमरापूर येथील पशुपती गोशाळेच प्रतिनिधी केदार लेले, धुंदलवाडी येथील बहुला गोधाम गोशाळेचे प्रतिनिधी दामोदर दुलालदास, वाडा येथील श्रीराम दृष्टी गोशाळेचे प्रतिनिधी किशोर कराळे, देवखोप येथील गोशाळेचे प्रतिनिधी सुरेशभाई सावला तसेच जिल्ह्यातील इतर गोरक्षक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गोरक्षकांनी मोहिमेबाबत विविध सूचना आणि अडचणी मांडल्या. गोरक्षक रात्रीच्या वेळी गोवंश ताब्यात घेण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांना अधिकृत ओळखपत्र अथवा बॅच देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेली जनावरे गोशाळेत आणल्यानंतर त्यासंदर्भातील कायदेशीर प्रकरणे गोशाळांना लढावी लागू नयेत, त्यासाठी पोलिसांनी आवश्यक सहकार्य करावे, तसेच या प्रक्रियेत होणारा खर्चही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी मागणी गोरक्षकांनी केली.गोवंशाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा रंग एकसारखा असावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागांतून ताब्यात घेण्यात येणाऱ्या जनावरांचे गोशाळांमध्ये नियोजनबद्ध स्थलांतर करण्याबाबतही चर्चा झाली. पालघर-माहीम बोइसर परिसरातील जनावरे देवखोप आणि वसई येथील गोशाळेकडे, तर आच्छाड-चारोटी परिसरातील जनावरे वापी येथील गोशाळेकडे पाठविण्याबाबत प्राथमिक नियोजन करण्यात आले.भटक्या गोवंशामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला निर्माण होणारा धोका कमी करण्यासोबतच गोवंशाला सुरक्षित निवारा आणि आवश्यक देखभाल मिळावी, या उद्देशाने प्रशासनाकडून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आपल्या मालकीचा गोवंश रस्त्यावर मोकाट सोडू नये आणि या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



