Aarey Drugs कंपनीच्या घातक प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त; वारंवार गुन्हे दाखल तरीही MPCB ची कारवाई केवळ कागदावरच? बातमी दाबण्यासाठी ‘प्रसाद’
वाटल्याचाही आरोप!
बोईसर / तारापूर (विशेष प्रतिनिधी): युसुफ सय्यद.
तारापूर एमआयडीसी (बोईसर) मधील Aarey Drugs & Pharmaceuticals Limited या कंपनीकडून होणाऱ्या घातक प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कंपनीमध्ये तयार होणाऱ्या अतिघातक रासायनिक घटकांमुळे आणि हवेत-पाण्यात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक उत्सर्जनामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कंपनीवर यापूर्वीही विविध उल्लंघनांप्रकरणी गुन्हे व तक्रारींची नोंद असताना, प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) नेमके कोणाच्या दबावाखाली गप्प आहे, असा संतापजनक सवाल आता उपस्थित होत आहे.
घातक रसायनांमुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात
कंपनीच्या परिसरातून सातत्याने येणारा उग्र वास, विषारी वायू आणि दूषित घटकांमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास आणि त्वचेचे आजार जाणवत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. रासायनिक सांडपाणी आणि घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता थेट पर्यावरणाला हानी पोहोचवली जात असल्याचा थेट आरोप स्थानिकांनी केला आहे.
MPCB च्या भूमिकेवर संशयाचे सावट कंपनीविरोधात यापूर्वी अनेक तक्रारी आणि गुन्हे दाखल असतानाही, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) यावर कठोर कारवाई का केली नाही? केवळ तात्पुरत्या नोटिसा देऊन प्रकरणावर पडदा का टाकला जातो? प्रशासनाच्या या संशयास्पद मौनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
बातमी दडपण्यासाठी ‘प्रसाद’ वाटल्याचाही आरोप
या सर्व गंभीर परिस्थितीविरोधात आवाज उठवणारी बातमी प्रसारमाध्यमांत येऊ नये, यासाठी ‘वाडे’ नावाच्या एका व्यक्तीमार्फत मध्यस्थी करून ‘प्रसाद’ (अर्थकारण) वाटल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे. त्यामुळे घातक प्रदूषणासह आता बातमी दाबण्याच्या या प्रयत्नामुळे संपूर्ण तारापूर-बोईसर औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
तातडीने कारवाईची मागणी या घातक रासायनिक कंपनीची तात्काळ निष्पक्ष तपासणी करून कंपनीवर दंडात्मक तसेच सील ठोकण्याची कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त स्थानिक नागरिकांनी दिला आहे.



