पालघर कचेरी रोड प्रश्नावर प्रशासनाला मुदत 24 डिसेंबरपर्यंत काम नाही तर मोठं आंदोलन.
पालघर (प्रतिनिधी) : अर्पिता तिवारी.
पालघर शहरातील कचेरी रोड – पाच बत्ती येथील रस्त्याची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था सध्या नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि रुग्णवाहिकांना होणारा विलंब ही बाब रोजची झाली आहे. या गंभीर परिस्थितीबाबत नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली आहे.

या संदर्भात जावेद म. लुलानिया यांनी पालघर पोलीस प्रशासन व पालघर नगरपरिषद यांच्याशी चर्चा केली. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने पोलीस बंदोबस्तावर ताण आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रस्तावित रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, दिनांक 24 डिसेंबरपूर्वी सदर रस्त्याची दुरुस्ती प्रत्यक्ष सुरू करण्यात येईल.

मात्र, 24 डिसेंबरपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालघर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ता रोखून शांततापूर्ण आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस पालघर नगरपरिषद पूर्णपणे जबाबदार राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनावर लक्ष ठेवले असून, आता प्रत्यक्ष काम सुरू होईल का याकडे संपूर्ण पालघरचे लक्ष लागले आहे.
— जावेद म. लुलानिया
पालघर



