पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक प्रहार; गुंतवणूक फसवणूक व घरफोडी प्रकरणात यशस्वी कारवाई.
पालघर :
पालघर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी कडक पावले उचलत आर्थिक फसवणूक तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला आहे.
शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या RICH 2 MONEY PVT. LTD. या कंपनीमार्फत झालेल्या प्रकरणात एकूण ₹2,35,46,695/- (दोन कोटी पंचेचाळीस लाख सहे हजार सहाशे पंच्याण्णव रुपये) इतक्या रकमेची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मा. श्री. यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांच्या देखरेखीखाली आर्थिक गुन्हे शाखा, पालघर करत आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील साफळा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातही पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. रात्रीच्या सुमारास घरफोडी करून दोन मोबाईल फोन व रोख रक्कम सुमारे ₹50,000/- चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
सदर घरफोडी प्रकरणातील कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच साफळा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली आहे.
पालघर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गुंतवणुकीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या आमिषांना बळी पडू नये तसेच संशयास्पद हालचाली किंवा गुन्ह्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दल सतर्क असून पुढील कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



