पालघर प्रकरणात कारवाईचा अभाव; न्यायासाठी 30 मार्च रोजी आमरण उपोषण
पालघर | अर्पिता तिवारी.
दिनांक : 15 मार्च 2026.

पालघर येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या घटनेबाबत संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत 16 फेब्रुवारी 2026 रोजी पालघर पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.




माहितीनुसार, या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तक्रारदारांचा लेखी जबाब देखील घेतलेला आहे. तरीसुद्धा पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमकी चौकशी सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, न्याय मिळावा या मागणीसाठी हाजी जावेद मजीद लुलानिया व शमीम शेख यांनी प्रशासनाला यापूर्वी आमरण उपोषणाबाबत लेखी निवेदन दिले होते. प्रारंभी हे उपोषण 16 मार्च 2026 रोजी करण्याचे जाहीर करण्यात आले होते.


मात्र सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्याचा विचार करून समाजातील मान्यवर व्यक्ती व नागरिकांच्या विनंतीनुसार आंदोलनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता पालघर कचेरी रोड येथील शासकीय रुग्णालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, या प्रकरणात न्याय मिळावा आणि संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच आमची मागणी आहे. जर या उपोषणानंतरही तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर पुढील कायदेशीर पाऊल उचलत न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



