घरफोडी चोरी प्रकरणाचा छडा; वाडा पोलिसांची मोठी कारवाई, दोन सराईत आरोपी अटकेत, रिव्हॉल्वर जप्त
पालघर (वाडा) | प्रतिनिधी. अमीन मेमन.
पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत वाडा पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान चोरीतील मुद्देमालासह एक देशी बनावटीचा रिव्हॉल्वर देखील जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश काशिनाथ पाटील (वय ५१, रा. देवघर, ता. वाडा, जि. पालघर) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ₹२,१६,०००/- किमतीचे सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या होत्या. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी अजित उर्फ बाळ्या प्रकाश पाटील (वय ३५, रा. खालापूर, ता. वाडा) यास अटक केली. पुढील चौकशीत त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल व एक पिस्तूल (रिव्हॉल्वर) जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतीस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, वाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुढील तपास वाडा पोलीस ठाणे करीत आहे.



