महिलांच्या आरोग्यासाठी स्तुत्य उपक्रम — बोईसरमध्ये गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

महिलांच्या आरोग्यासाठी स्तुत्य उपक्रम — बोईसरमध्ये गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

बोईसर येथे महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि गर्भाशय मुख कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोटरी क्लब ऑफ पालघर, रोटरी क्लब ऑफ मुलुंड आणि वंजारी समाज हितवर्धक मंडळ, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या शिबिरामध्ये परिसरातील एकूण ४६ महिलांची अत्यंत सूक्ष्म वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उपस्थित महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व समुपदेशन देखील करण्यात आले. महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या शिबिराला २१स्ट सेंचुरी कॅन्सर केअर सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नाडकर्णी यांनी विशेष भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने महिलांची तपासणी करून आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

शिबिरासाठी आवश्यक औषधांची व्यवस्था रोटरी क्लबचे उपाध्यक्ष रफिक भाई यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. तसेच शिबिराचे नियोजन, डॉक्टरांची व्यवस्था आणि संपूर्ण समन्वय रोटरीचे मेडिकल डायरेक्टर कल्पेश पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळला.

वंजारी समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने रुग्ण व वैद्यकीय पथकासाठी न्याहारी आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नोंदणी प्रक्रिया देखील अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडली

या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय महाजन आणि सचिव मनीष पिंपळे उपस्थित राहून संपूर्ण टीमला प्रोत्साहन दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मेडिकल डायरेक्टर डॉ. भावेश पाटील आणि प्रोजेक्ट चेअरमन शैला महाजन यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाचे बोईसर परिसरात सर्वत्र स्वागत होत असून, अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

🖊️ पालघर नागरिक

जाग महाराष्ट्र न्यूज

✍️ “आम्ही नेहमी सत्य दाखवण्याचे साहस करतो.”

👤 चीफ एडिटर – जावेद लुलानिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *