पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चोरीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद..

Oplus_16908288

पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चोरीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद..

पालघर, दि. १७ मे : पालघर जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी तपासाची झलक दाखवत अवघ्या २४ तासांच्या आत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मे २०२६ रोजी नामदेव दत्तात्रेय म्हात्रे (वय ६३ वर्षे, रा. कडून नवापाडा, पालघर) हे सोन्याचे दागिने विक्री करून सायंकाळी घरी परतत असताना दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवर येऊन त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली. या पिशवीत सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा आणि तारापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने तपास सुरू केला. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे आरोपी प्रशांत सुरेश पाटील (वय २४ वर्षे, रा. पूर्व भंडारआळी, बोईसर) याचा शोध घेण्यात यश आले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले ३ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली MH-48-CW-0515 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तारापूर पोलीस करीत आहेत.

या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि तारापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पालघर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालघर पोलीस सातत्याने दक्ष असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज

चीफ एडिटर – जावेद लुलानिया, पालघर

“आम्ही नेहमी सत्य दाखवण्याचे साहस करतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *