शिरगाव बीचवरील घोडागाडी व्यवसायावर बंदी; गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर..
पालघर, अर्पिता तिवारी दि. 31 मे.
शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर मागील 20 वर्षांहून अधिक काळ घोडागाडी (टांगा) चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक घोडागाडी चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सातपाटी पोलीस स्टेशनच्या निर्देशानुसार शिरगाव बीच परिसरात घोडागाडी व्यवसाय बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक चालकांनी दिली आहे.

घोडागाडी चालकांच्या म्हणण्यानुसार, हा व्यवसायच त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार आहे. पर्यटकांना घोडागाडीची सेवा देऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनेक कुटुंबांची रोजीरोटी पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहे. उन्हाळ्याची सुट्टी आणि पर्यटन हंगाम हा त्यांच्यासाठी कमाईचा महत्त्वाचा काळ असतो. अशा परिस्थितीत घोडागाडी व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
स्थानिक चालकांनी सांगितले की, सातपाटी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचवेळी इतर काही किनारी भागांमध्ये घोडागाडी सुरू असल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर येत असल्याने चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
घोडागाडी चालक हे कायद्याचा आदर करणारे स्थानिक नागरिक असून त्यांनी प्रशासनाकडे कोणतीही विशेष सवलत नव्हे, तर कायदेशीर मार्गाने व्यवसाय करण्याची संधी मागितली आहे. आवश्यक अटी, नियम आणि परवानग्या पूर्ण करून त्यांना अधिकृतपणे घोडागाडी चालविण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
नव भारतीय शिव वाहतूक सेना, पालघर जिल्हा या घोडागाडी चालकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. या गरीब कुटुंबांची रोजीरोटी पुन्हा सुरू व्हावी यासाठी संबंधित प्रशासनाशी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्यात येईल.
प्रशासनाने या विषयाची दखल घेऊन घोडागाडी चालकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करावा व कायदेशीर चौकटीत त्यांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात येत आहे.
✍️ जावेद मजीद लुलानिया
जिल्हाध्यक्ष – पालघर
नव भारतीय शिव वाहतूक सेना



