रिलायन्स मॉल ते गणेशकुंड दरम्यान सुरू असलेल्या कामावर प्रश्नचिन्ह; ठेकेदार व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका नागरिकांना

पालघर शहरातील रस्ते कामामुळे नागरिक त्रस्त!
रिलायन्स मॉल ते गणेशकुंड दरम्यान सुरू असलेल्या कामावर प्रश्नचिन्ह; ठेकेदार व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका नागरिकांना
📍 पालघर | 03 जून 2026
पालघर शहरातील रिलायन्स मॉल ते गणेशकुंड परिसरातील रस्त्याचे काम सध्या सुरू असून, या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील परिस्थिती अधिकच बिकट झाली असून वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जुन्या काँक्रीट रस्त्याचे खोदकाम करून नवीन काँक्रीट रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सूचना फलक, धोक्याचे इशारे, डायव्हर्शन बोर्ड किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अचानक रस्ता बंद किंवा खोदकाम असल्याचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्याची वास्तविक स्थिती दिसून येत नाही. यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचा आरोप आहे की ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि पालघर नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागरिकांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक रस्त्यावरील कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना त्याचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक विभाग, वाहतूक पोलीस आणि पालघर नगर परिषद यांनी संयुक्त पाहणी करून नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
पालघरकरांचा प्रश्न एकच — नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा ठेकेदारांची मनमानी महत्त्वाची का?
आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार की एखादा अपघात झाल्यानंतरच जागे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
✍️ जाग महाराष्ट्र न्यूज
🚩 जावेद मजीद लुलानिया
जिल्हाध्यक्ष – नव भारतीय शिव वाहतूक सेना, पालघर जिल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *