कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात नव भारतीय शिव वाहतूक सेनेचा दणका; वाहतूक पोलिसांची कारवाईची चेतावणी 🚨
पालघर शहरातील कचेरी रोड परिसरात वाढत्या बेकायदेशीर पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला आहे. आज नव भारतीय शिव वाहतूक सेना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया यांनी स्वतः पुढाकार घेत वाहतूक पोलीस आणि 112 आपत्कालीन सेवेवर संपर्क साधून संबंधित विभागाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले.
वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पालघर शासकीय रुग्णालय ते पाचबत्ती नाका या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीरपणे उभी करण्यात आलेली वाहने, रस्त्यावरच पार्किंग करून निघून जाणारे वाहनचालक तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विविध बाबी पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
·
विशेषतः वसई विकास बँकेसमोरील परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या सर्व्हिस गाड्या, बिसलेरी पाणी पुरवठा करणारे टेम्पो, भाडे वाहतूक करणारी वाहने तसेच इतर अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करून निघून जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याची बाब समोर आली. यामुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना समज देत स्पष्ट इशारा दिला की, यापुढे रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी आपली वाहने नियमानुसार पार्क करून वाहतुकीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जावेद लुलानिया यांनी पालघर नगर परिषदेकडेही मागणी करत सांगितले की, रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्या, वडापाव, पाणीपुरी, फ्रूट सॅलड, ऊस रस विक्रेते आणि इतर अतिक्रमणांमुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, वाहतूक पोलीस आणि नगर परिषद यांनी संयुक्तपणे कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
✍️ जावेद लुलानिया जिल्हाध्यक्ष, नव भारतीय शिव वाहतूक सेना, पालघर



