घोलवड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
पालघर | जावेद लूलानीया.
पालघर जिल्ह्यातील घोलवड, डहाणू आणि वाणगाव परिसरात घडलेल्या घरफोडीच्या ७ गुन्ह्यांचा छडा लावत घोलवड पोलीस स्टेशनने मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सोने, चांदी, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंसह एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डी परिसरातील एका घरफोडी प्रकरणाचा तपास सुरू असताना घोलवड पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी घोलवड, डहाणू आणि वाणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या एकूण ७ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ७ तोळे सोने, १ किलो चांदी, १ लाख १ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता काणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सपोनि. संदीप कन्हाळे (प्रभारी अधिकारी, घोलवड पोलीस ठाणे), पोउनि. विशाल पवार, पोउनि. परमेश्वर जाधव, सपोउनि. कृष्णा पवार तसेच घोलवड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. पालघर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
“गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही.“



