NH-48 वरील महालक्ष्मी मंदिर उड्डाणपुलावर मोठा खड्डा; लोखंडी सळया उघड्या, वाहनचालकांचा जीव धोक्यात
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वरील महालक्ष्मी मंदिर उड्डाणपुलावर, गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाच्या पृष्ठभागावर मोठा खड्डा पडून त्यातील लोखंडी सळया (Reinforcement Steel) उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे दुचाकी, कार, रिक्षा, टेम्पो, ट्रक तसेच इतर वाहनचालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा खड्डा निर्माण झाल्यानंतरही संबंधित यंत्रणेकडून वेळेत दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी आज रात्री सुमारे १५ वाहनांचे टायर पंचर झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर बनल्यानंतर अखेर पोलिसांना वाहतुकीसाठी एक लेन बंद ठेवण्याची वेळ आली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील देखभालीतील गंभीर त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. अशा स्थितीत हा उघडा खड्डा आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळया यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
✍️ जाग महाराष्ट्र न्यूज | NH-48 इन्फॉर्मेशन ग्रुप



