रोटरी क्लब ऑफ पालघर आणि इनरव्हील क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक २ जुलै,२०२६ रोजी नवली येथील कै.गोविंदराव दा.ठाकूर सभागृहात “वात्सल्य वेल” हा जेष्ठ नागरिकांसाठी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.
या विशेष प्रसंगी पालघरच्या गायन क्षेत्रातील जेष्ठ कलाकार श्रीमती पुष्पा पागधरे व वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.सुनित राऊत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीमती पुष्पा पागधरे यांनी आपल्या सुमधुर, भावस्पर्शी आणि सुरेल गायकीने असंख्य रसिकांच्या हृदयात अढळ स्थान तसेच संगीत कलेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी दिलेले अमूल्य योगदान हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.भूषण सावे यांनी केले.
त्याचप्रमाणे डॉक्टर सुनित राऊत यांनी वैद्यकीय क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या करुणामय सेवा व निसर्ग संवर्धनासाठी जपलेली अखंड निष्ठा आणि समर्पण ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.या योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यास आम्हाला अत्यंत आनंद, अभिमान आणि समाधान वाटत आहे असे श्री.भूषण सावे यांनी म्हटले.रोटरी क्लबच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवा प्रकल्प उदा.डायलिसिस सेंटर, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रशिक्षण आणि महिला सक्षमीकरण कार्यशाळा बद्दल माहिती दिली.इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.अनुश्री जयेश आव्हाड यांनी मैत्री, सेवा व स्नेहभाव या त्रिसूत्रीवर आधारित विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळांचे नुतनीकरण विविधआरोग्यविषयक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत त्याबद्दल माहिती दिली
.
आनंद वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांनी सुंदर कार्यक्रम सादर केला.
त्याचप्रमाणे ऋतुजा नृत्यालयातर्फे बहारदार नृत्यांविष्कार सादर करण्यात आला. महाराष्ष्ट्राच्या विविध सांस्कृतिक परंपरेची छान झलक त्यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.निता डांगे व डॉ.संजय डांगे यांनी केले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.भूषण सावे, सचिव रो.अमित पाटील, रोटरी डिस्ष्ट्रीक्ट सेक्रेटरी मिलिंद उलकंदे,असिस्टंट गव्हर्नर रो.जयेश आव्हाड , इनरव्हील क्लबच्या सचिव सौ.मृदुला सावे व अनेक सदस्यांनी उत्साहात भाग घेतला.पालघर तालुक्यातील वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामांकित व जेष्ठ नागरिकांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली.



