पालघर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध तंबाखूजन्य पदार्थ वाहतुकीविरोधात ४ गुन्हे, ₹३८.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पालघर जिल्हा पोलिसांनी अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तलासरी, मनोर आणि कासा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून वाहनांसह एकूण ₹३८,४३,६८६ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व संबंधित पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुप्त माहितीच्या आधारे केली. जप्त केलेल्या वाहनांमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी विविध चारचाकी वाहनांसह मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.
📰 पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज



