विक्रमगड : १०८ रुग्णवाहिका ठप्प – जीव वाचवणारी सेवा की मृत्यूवाहिका..?
प्रतिक मयेकर (प्रतिनिधि)
पालघर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणाचे अजून एक भयानक चित्र समोर आले आहे. सोमठा प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका विक्रमगड येथे रुग्ण घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला ठप्प पडली. दुर्दैव असे की या रुग्णवाहिकेत नुकतीच प्रसूती झालेली महिला आणि तिचे नवजात बाळ होते. बाळाचे वजन कमी असल्याने तातडीने जव्हार येथील रुग्णालयात नेण्याचे आदेश डॉक्टरांनी दिले होते. मात्र प्रवासादरम्यानच गाडीने साथ सोडली आणि आई-बालकाचे प्राण धोक्यात आले. काही काळासाठी गाडीतच अडकून पडलेल्या या कुटुंबाचा जीव अक्षरशः देवाच्या भरोशावर होता.
रुग्णवाहिका म्हणजे जनतेसाठी जीवनदायिनी सेवा, पण आता त्या जीवनदायिनी की मृत्यूवाहिनी? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. जीव वाचवण्यासाठी असलेल्या या वाहनांनी जर उलट मृत्यूला आमंत्रण द्यायला सुरुवात केली तर लोकांनी कोणाकडे धाव घ्यावी? प्रशासनाकडे का, की ठेकेदाराकडे?
१०८ रुग्णवाहिका सेवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाली खरी, पण प्रत्यक्षात तिच्या देखभालीकडे कोणीही लक्ष देत नाही. नादुरुस्त गाड्या रस्त्यावर धावत आहेत, तपासणी नावालाच होते, आणि ठेकेदार केवळ नफ्याकडे डोळे लावून बसले आहेत. आरोग्य विभाग मात्र आकडेवारीच्या आणि बैठकींच्या पलीकडे पाहायलाच तयार नाही. “रुग्ण जिवंत राहतो की मरतो याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही” – असा संदेशच जणू या सिस्टीममधून जनतेपर्यंत पोहोचतो आहे.
अधिक संतापजनक म्हणजे लोकप्रतिनिधींचे मौन!
निवडणुकीच्या वेळी घराघरांत येऊन मत मागणारे खासदार-आमदार, आज जीव-मरणाचा प्रश्न समोर असताना गप्प बसले आहेत. त्यांच्या भाषणांत आरोग्याची चर्चा होते, पण प्रत्यक्ष कृती मात्र शून्य. लोकप्रतिनिधींचा हा कर्णकर्कश मौन म्हणजे जनतेच्या आरोग्याला मृत्युदंडच ठरत आहे.
गाडी बंद पडली, त्या क्षणी जर आत गंभीर रुग्ण असता तर त्याचा मृत्यू अटळ होता. मग त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? आरोग्य विभाग? ठेकेदार? की ही संपूर्ण प्रणाली? जनतेच्या मनात आज हा प्रश्न खोलवर रुतून बसला आहे. आता तरी प्रशासनाने डोळे उघडावेत आणि गाड्यांची देखभाल, तपासणी तातडीने करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा या ढिसाळ व्यवस्थेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आजची १०८ रुग्णवाहिका जनतेसाठी जीवनदायिनी ठरणार की मृत्यूवाहिनी ठरणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पण एक मात्र खरे – आरोग्य विभागाच्या या बेफिकीरीने आणि लोकप्रतिनिधींच्या मौनाने जनतेचा विश्वास संपुष्टात येत चालला आहे.
आदिवासी जिल्हा – म्हणून का अशी दुर्दशा?
पालघर हा प्रामुख्याने आदिवासी बहुल जिल्हा. येथे प्रशासन नेहमीच “हे आदिवासी आहेत, गप्प बसतील” या मानसिकतेतून वागत असल्याची भावना लोकांमध्ये आहे. जिल्ह्यात गेली दहा वर्षे तेच जुनेच जीवघेणे रुग्णवाहन ताफे फिरत आहेत. गाड्यांची तपासणी नाही, दुरुस्ती नाही, तरीही त्या जनतेच्या जीवाशी खेळत धावत आहेत.
नव्या गाड्या कुठे गेल्या?
आरोग्य विभागाने मागील काही वर्षांत १०८ सेवेसाठी नवीन रुग्णवाहिका दिल्याचे कागदोपत्री दाखवले होते. मग आज प्रश्न असा – त्या नव्या गाड्या कुठे गेल्या? खरंच जनतेच्या सेवेसाठी धावत आहेत का, की काही वेगळ्याच ‘ठिकाणी’ गायब झाल्या? भ्रष्टाचार, अपहार आणि कंत्राटी तडजोडींच्या जाळ्यात या गाड्या अडकल्या आहेत का, असा संशय नागरिकांच्या मनात बळावतो आहे.
प्रतिक्रिया
“पालघर जिल्हा आदिवासी बहुल असल्यामुळेच येथे नेहमी दुजाभाव केला जातो. शहरी भागात आधुनिक रुग्णवाहिका धावत असताना, आमच्या भागात मात्र १०-१२ वर्षं जुनी गाड्याच जीवावर बेततात. आमच्या मुलांचे जीव स्वस्त आहेत का? आदिवासींच्या जीवाला किंमत नाही का? जर हा प्रकार मुंबईत घडला असता तर जबाबदार तुरुंगात गेले असते. पण हा प्रश्न आदिवासींचा असल्यामुळे सरकार गप्प आहे. राज्य शासनाने तरी आता डोळे उघडावेत. हे केवळ प्रशासनाचे नाही, तर जिल्हा नियोजन समितीचेही अपयश आहे. रुग्णवाहिका सेवेसाठी दरवर्षी निधी मंजूर होतो, कागदोपत्री नवी वाहने दाखवली जातात, पण प्रत्यक्षात रस्त्यावर मात्र जुन्याच गाड्या धावत आहेत. हा हिशोब जनतेसमोर मांडलाच पाहिजे.”
विनोद निकोले,आमदार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), डहाणू
प्रतिक्रिया
“१०८ रुग्णवाहिका ठप्प पडल्याची घटना अतिशय गंभीर व दुर्दैवी आहे. प्रसूतीनंतर महिलेचा व नवजात बाळाचा जीव धोक्यात आला ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली असून, संबंधित घटनेची चौकशी सुरू केली आहे. नागरिकांच्या जीवाशी कुठलाही धोका पत्करला जाणार नाही, हे प्रशासनाचे स्पष्ट धोरण आहे. नवीन रुग्णवाहिकांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून, लवकरच पालघर जिल्ह्याला ७५ आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. ग्रामीण व आदिवासी भागातही वेळेत व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर
प्रतिक्रिया
“आमच्या नियंत्रण कक्षाकडे सध्या पालघर जिल्ह्यासाठी एकूण २९ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. प्रत्येक वाहनाची लोकेशन, स्थिती आणि कॉल रिस्पॉन्स हे आम्ही सतत मॉनिटर करतो. विक्रमगड येथे गाडी ठप्प पडण्याची घटना दुर्दैवी आहे, मात्र रुग्ण व बाळाला सुरक्षित पोहोचवण्यासाठी तातडीने पर्यायी वाहन पाठवण्यात आले. १०८ सेवा ही २४ तास कार्यरत असून, नागरिकांनी कोणत्याही प्रसंगी १०८ वर कॉल केल्यास त्वरित मदत मिळेल, याची आम्ही खात्री देतो. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी वाहनांच्या तपासणीवर अधिक भर देण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत.”
१०८ हेल्पलाइन कंट्रोल रूम इन्चार्ज
प्रतिक्रिया
“रुग्णवाहिकांच्या बिघाडामुळे नागरिकांना होत असलेला त्रास आमच्यापर्यंत पोहोचला आहे. या महिन्यातच पाच ते सहा तक्रारी अधिकृतरीत्या प्राप्त झाल्या असून, त्यावर त्वरित कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत सविस्तर अर्ज सादर केला आहे. पालघर जिल्ह्यासाठी किमान ७५ नवीन रुग्णवाहिकांची तातडीची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही औपचारिक मागणी केली आहे. आरोग्य ही नागरिकांची प्राथमिक गरज आहे, त्यात कुठलाही तडजोड होणार नाही. जुन्या, धोकादायक गाड्यांऐवजी सुरक्षित आणि आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनावर सातत्याने दबाव आणत राहू.”
डॉ.अब्दुल खान,पालघर जिल्हा व्यवस्थापक



