प्रतिक मयेकर
📍 पालघर
“फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” हा आरोग्यदायी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर पोलीस दलाने दि. २४ ऑगस्ट रोजी भव्य सायक्लोथॉनचे आयोजन केले. भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील रस्ते सकाळी लवकरच पोलिसांच्या शिस्तीने व नागरिकांच्या जोशपूर्ण सहभागाने दणाणून गेले.

सकाळी नेमक्या सात वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातून सायक्लोथॉनला सुरुवात झाली. दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेली ही सायक्लोथॉन १० कि.मी. आणि २५ कि.मी. अंतराची होती. १० कि.मी.च्या गटाने अधीक्षक कार्यालय, चाररस्ता रेल्वे स्टेशन, माहिम वळण नाका असा मार्ग पार करत परत अधीक्षक कार्यालयात धडक दिली. तर खरी ताकद दाखवणारा २५ कि.मी.चा गट अधीक्षक कार्यालयातून निघून माहिम रेल्वे स्टेशन, माहिम पोलीस दुरक्षेत्र, मंगलम रिसॉर्ट मार्गे पुन्हा त्याच मार्गाने परतला. मार्गावर सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट, नागरिकांचा उत्साह आणि पोलीस दलाची शिस्त यांचे सुंदर मिश्रण अनुभवायला मिळाले.

या उपक्रमात केवळ पोलिसांनीच नव्हे तर जिल्ह्यातील तब्बल २५५ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वयाने लहान-मोठे, तरुण, विद्यार्थी, महिला अशा सर्वच घटकांनी सायक्लोथॉनमध्ये भाग घेऊन आरोग्य व फिटनेसच्या महत्त्वाला अधोरेखित केले. एकाच तालावर सायकल चालवत पुढे सरकणाऱ्या सहभागींचा उत्साह जिल्हावासीयांसाठी प्रेरणादायी ठरला.

सायक्लोथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या हस्ते सर्वांना प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात वातावरण जल्लोषमय झाले होते.

उपक्रम यशस्वी होण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे योगदानही महत्त्वपूर्ण राहिले. पोलीस दलाचा फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळे या उपक्रमाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
आरोग्य हेच खरे संपत्ती असल्याचा संदेश देत पालघर पोलीस दलाने केलेल्या या सायक्लोथॉन उपक्रमाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे. नागरिकांच्या स्मरणात कायम राहील अशी ही सकाळ, फिटनेस व एकतेचा सुंदर संगम ठरली



