पालघरच्या श्वासावर विराजचा गळा – पर्यावरण मंत्री अजूनही “अदृश्य”…

प्रतिक मयेकर (प्रतिनिधि), बोईसर

बोईसर| तारापूर औद्योगिक प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि या प्रदूषणाच्या आघाडीवर विराज कंपनीचे नाव सर्वात वर आहे. हवेत मिसळणारा काळा धूर, कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी रसायनांचे ढग आणि गावोगाव पसरलेली दुर्गंधी — ही आता इथल्या नागरिकांची नशिबी आलेली रोजची शिक्षा झाली आहे. दररोज शेकडो टन धूर आणि रासायनिक कचरा नदी, नाले आणि जमिनीत मिसळत आहे. श्वसनविकार, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, लहान मुलांचे अस्थमा आणि वृद्धांच्या फुफ्फुसांवर थेट आघात — या सगळ्याचे मूळ हाच औद्योगिक विषारी वर्षाव आहे. तरीही पर्यावरण मंत्री मात्र अजूनही ‘पालघर प्रवास’ टाळत आहेत.

मंत्री महोदय, हा दौरा एवढा अवघड का?
पालघरच्या श्वासावर संकट कोसळलेले असताना, राज्याचे पर्यावरण मंत्री अद्याप जिल्ह्याचा दौरा करून परिस्थिती पाहायला आलेले नाहीत. जनतेच्या आरोग्याचा सवाल असताना, जबाबदार मंत्री एवढ्या निष्क्रिय राहू शकतात का? हा दौरा टाळणे म्हणजे, प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना अप्रत्यक्ष मूकमान्यता देणे नाही का?

विराज कंपनीची ‘विकास’ कथा – पण कोणासाठी?
विराज कंपनीने रोजगार दिला, विकास केला, अशी कागदी बाजू मांडली जाते. पण वास्तवात हा विकास केवळ कंपनीच्या नफ्यासाठी आहे. गावकऱ्यांचा शुद्ध पाणी, स्वच्छ हवा आणि आरोग्याचा हक्क हिरावून घेतला जातोय. नफ्याच्या हव्यासाखाली, जमिनी आणि लोकांची तब्येत दोन्हीचा बळी जात आहे.

प्रशासनाची गप्प बसण्याची सवय
औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे दूषित पाणी, रसायनांचे बेकायदेशीर साठे, धुरकट आकाश — सगळे प्रशासनाला दिसते, पण कारवाई मात्र कागदापुरती. प्रदूषण नियंत्रण मंडळाची तपासणी कधी होते, तर कधी रिपोर्ट ‘साफ’ येतो, कारण तपासणी आधीच उद्योगपतींना कळवली जाते.

जनता विचारते – आमचा श्वास कोण वाचवणार?
पालघर जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, मासेमार, महिला, लहान मुले — सगळे या प्रदूषणाच्या सावटाखाली आहेत. आता जनतेला एकच प्रश्न — “मंत्री महोदय, तुम्ही आमच्यासाठी आहात की उद्योगपतींसाठी?” तुम्ही इथे येऊन सत्य बघाल का, की काचेच्या वातानुकूलित केबिनमधूनच फाईली सही करत बसाल?

जनता जागली तर बदल घडेल
जोपर्यंत जनता आवाज उठवत नाही, तोपर्यंत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांचा कहर सुरू राहणार.
पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने मिळून हा मुद्दा राज्यभर नेला, तर मंत्री महोदयांना पालघरला यावेच लागेल. कारण श्वास हा दान नाही, तो जन्मसिद्ध हक्क आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *