पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज
पालघर: अर्पिता तिवारी.
पालघर जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
डहाणू-बोरीवली मेमू ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या २० वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीवर चालत्या ट्रेनमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ५ वाजून २० मिनिटांनी ही तरुणी मेमू ट्रेनने प्रवास करत होती. त्यावेळी २८ वर्षीय आरोपी लेडीज डब्यात आला आणि काही वेळ बोलल्यानंतर त्याने अचानक तरुणीचा गळा दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.मात्र, या संकटाच्या प्रसंगी तरुणीने घाबरून न जाता धाडसाने प्रतिकार केला आणि आरोपीच्या डोळ्यात बोट घालून स्वतःचा बचाव केला. तिच्या आरडाओरडीनंतर इतर प्रवाशांचे लक्ष गेले. दरम्यान, ट्रेन वाणगाव स्थानकात पोहोचताच आरोपी ट्रेनमधून उतरून फरार झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेदरम्यान रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून तातडीने मदत मिळाली का, आरपीएफची गस्त कितपत प्रभावी आहे आणि महिला डब्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरेशी आहे का, याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
डहाणू, बोईसर, पालघर आणि वाणगाव या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने महिला आणि विद्यार्थिनी प्रवास करतात. त्यामुळे महिला डब्यांमध्ये नियमित सुरक्षा गस्त वाढवावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पालघर नागरिक | PN24 NEWS
“महिलांची सुरक्षा हीच सर्वांची जबाबदारी!”



