पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज
पालघर.:रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतर शिवसेनेची पालघरमध्ये मोठी कारवाई! ७ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; राहुल घरतला पोलीस कोठडी.
पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या कथित गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे.या प्रकरणात पालघर पोलिसांनी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, शिवसेना पालघर शहरप्रमुख राहुल रामदास घरत पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षाकडून पालघर जिल्ह्यातील ७ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात पक्षशिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून, बेजबाबदार वर्तन आणि पक्षशिस्तभंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेले पदाधिकारी:
1.कुंदन बाळकृष्ण संखे जिल्हाप्रमुख.
2.राहुल रामदास घरत शहरप्रमुख.
3.मनिश उर्फ विकी संखे उपतालुका प्रमुख.
4.साईराज पाटील जिल्हाप्रमुख, युवासेना.
5.रोहित गावी उपतालुका प्रमुख, युवासेना.
6.राहुल संखे उपतालुकाप्रमुख
7.ऋषभ वारे युवासेना विधानसभा प्रमुख.
रुग्णालयातील घटनेनंतर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील मारहाण कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली आहे. तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, कायदा हातात घेणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पालघरमध्ये चर्चेला उधाण
शिवसेनेच्या नावाचा वापर करून दबाव निर्माण करण्याच्या आरोपांमुळे आधीच हे प्रकरण चर्चेत आले होते. आता पक्षानेच सात पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने “पक्षशिस्त सर्वांसाठी समान आहे का?” आणि या प्रकरणातील इतर आरोपींवर पुढे काय कारवाई होणार, याकडे पालघरकरांचे लक्ष लागले आहे.रुग्णालयातील घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून, दोष निश्चित करण्याचे काम न्यायालयीन प्रक्रियेत होणार आहे.
📰 पालघर नागरिक | जनतेचा आवाज



