पालघरमध्ये चोरट्यांचे धाडस वाढले? मध्यरात्री सोसायट्यांमध्ये संशयितांची वर्दळ; पालघर पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह!
कांचन युनिव्हर्स, बाफना विंडोज परिसरातील CCTV दृश्ये चर्चेत; नशेचा व्यापार आणि चोरीच्या घटनांवर पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी.
पालघर |
पालघर शहरात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत असताना आता मध्यरात्री निवासी सोसायट्यांमध्ये संशयित व्यक्तींची वर्दळ असल्याचे CCTV दृश्ये समोर आली आहेत. कांचन युनिव्हर्स आणि बाफना विंडोज परिसरातील असल्याचे सांगितले जाणारे हे दृश्य १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजताचे आहेत. या दृश्यांसोबत दोन संशयित व्यक्ती सोसायटी परिसरात फिरत असल्याचा संदेश व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. संबंधित व्यक्तींची ओळख, त्यांच्याकडे शस्त्रे होती का आणि त्यांचा चोरीच्या कोणत्याही घटनेशी संबंध आहे का, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पालघर पोलिसांनी या CCTV फुटेजची तातडीने तपासणी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त; पोलिसांची गस्त नेमकी कुठे?घरासमोरील मोटार, केबल, स्कूटर, सायकल तसेच इतर साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी देवीचा रोड परिसरात महिलेच्या हत्येची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त किती प्रभावी आहे? निवासी सोसायट्यांमध्ये संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जात आहे? चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडे ठोस कृती आराखडा आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नशेचा व्यापार आणि भंगार बाजारातील व्यवहारांची चौकशी करा! चोरीचे साहित्य सहज विकले जात असेल, तर चोरट्यांना पुन्हा गुन्हे करण्याचे प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे चोरीच्या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्यांची नियमानुसार तपासणी करणे आवश्यक आहे. पालघर पूर्वेतील गांधी नगरसह ज्या परिसरांमध्ये नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आहेत, त्या तक्रारींची पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी. नशेच्या अवैध व्यापारामुळे चोरीच्या घटना घडत असल्याचा संशय असेल, तर त्याची पुराव्यांच्या आधारे चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
मात्र, नशेचा व्यापार आणि चोरी यांचा थेट संबंध असल्याचे तपासातून सिद्ध होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. पोलिसांनी केवळ किरकोळ कारवाई न करता अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे.नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?शहरातील नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सोसायट्यांचे प्रवेशद्वार, पार्किंग परिसर आणि महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत. दुकानदारांनी दुकानाबाहेर कॅमेरे लावावेत, तर खासगी बंगले आणि इमारतींमध्ये सुरक्षा रक्षक व रात्रीच्या निगराणीची व्यवस्था मजबूत करावी. संशयित व्यक्ती आढळल्यास स्वतः त्यांचा सामना करण्याऐवजी तातडीने पोलिसांना कळवावे.
परंतु प्रश्न एवढाच आहे की, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय करायचे, तर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीची आणि गुन्हे प्रतिबंधक यंत्रणेची जबाबदारी कोण पार पाडणार? प्रत्येक चोरीनंतर तक्रार नोंदवणे आणि तपास सुरू असल्याचे सांगणे पुरेसे नाही. गुन्हे घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई दिसणेही तितकेच महत्त्वाचे आहे.पालघर पोलिसांनी तातडीने उत्तर द्यावे!पालघर पोलिसांनी संबंधित CCTV फुटेजची तपासणी करून संशयित व्यक्तींची ओळख पटवावी, सोसायट्यांमध्ये रात्रीची गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा तपास वेगाने पूर्ण करावा आणि नशेच्या अवैध व्यापाराविरोधात प्रभावी कारवाई करावी. व्हॉट्सॲपवरील संदेश खरा आहे की त्यामध्ये अतिशयोक्ती करण्यात आली आहे, हेही पोलिसांनी स्पष्ट करावे.
पालघर नागरिकांचा थेट सवाल
नागरिकांनी भीतीच्या वातावरणात जगायचे का? घराबाहेरील वस्तू, वाहने आणि स्वतःच्या घराच्या सुरक्षिततेची चिंता रोज करायची का?पोलिसांनी आता केवळ आश्वासने न देता ठोस कारवाईतून नागरिकांचा विश्वास संपादन करावा.
मुख्य संपादक : जावेद मजीद लुलानिया.
पालघर नागरिक



