पालघर पोलीस दलात “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन” उत्साहात साजरा
पालघर, दि. 02.01.2026 ( अर्पिता तिवारी)
पालघर पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस दलाच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचा गौरव करणारा “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पोलिस परेड मैदान, कोळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, परि. सहा. पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परेडचे संचालन उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांनी केले, तर सेकंड कमांडर म्हणून पोलीस मुख्यालयातील अधिकारी सहभागी झाले होते.
परेडमध्ये पोलीस मुख्यालय तसेच विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी शिस्तबद्ध सहभाग घेतला. या वेळी नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमात पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे आणि शिस्तीचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आपल्या मनोगतात पालघर पोलीस दल हे नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून समाजात शांतता, सुरक्षितता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. महिला व बालक सुरक्षा, वाहतूक शिस्त, तसेच जनजागृती अभियानांबाबत पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी पालघर पोलीस दलाने केलेल्या विविध कामगिरीचा आढावा घेत उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.



