३७वा रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत मनोर येथे वाहतूक जनजागृती मोहीम..
मनोर (पालघर)

३७व्या रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. यतीश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा, पालघर यांच्या वतीने मनोर येथे विविध ठिकाणी बॅनर लावून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
या अभियानाअंतर्गत मनोर बस स्टँड परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
यावेळी रिक्षा व टॅक्सी चालकांना खालील महत्त्वाच्या वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले —
सीट बेल्टचा वापर करणे, नो-पार्किंग ठिकाणी वाहन न लावणे, हेल्मेटचा वापर करणे, विनालायसन्स वाहन न चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास न देणे, ट्रिपल सीट टाळणे, अती वेगाने वाहन न चालवणे, सिग्नलचे पालन करणे तसेच विनानंबर प्लेट वाहन न चालवणे.
या जनजागृती कार्यक्रमात जिल्हा वाहतूक अंमलदार मोहन मुंढे व योगेश कमलेकर, ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार घोलप, तसेच रिक्षा–टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानामुळे रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास वाहतूक विभागाने व्यक्त केला आहे.



