Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?

Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?

मागील काही वर्षांपासून राज्यात शहरांची व जिल्ह्यांची नावे बदलण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशातच आता विरार (Virar) शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, विरारचे नाव ‘द्वारकाधीश’ (Dwarkadhish) करण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संभाव्य नामांतराच्या चर्चेमुळे शहरात तसेच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

विरार परिसरात ठिकठिकाणी ‘जय द्वारकाधीश’ अशा आशयाचे पिवळ्या व निळ्या रंगाचे फ्लेक्स झळकले असून, त्यानंतर विरार स्थानकासह शहराचे नाव बदलण्याची मागणी होत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या माध्यमांवर व्हिडिओ क्लिप्स, पोस्ट्स आणि प्रतिक्रियांमधून हा विषय झपाट्याने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये विरारचे नाव बदलून ‘द्वारकाधीश’ करण्यात यावे, असा सूर उमटताना दिसतो. एका व्हिडिओमध्ये एका महिलेने विरार हे नाव आवडत नसल्याने ते बदलावे, अशी थेट मागणी केली आहे. तर काही जणांनी भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेशी संबंधित असलेले ‘द्वारकाधीश’ हे नाव अधिक योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. या मागणीला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा उघडपणे पाठिंबा असल्याची चर्चा देखील रंगली आहे. मात्र, या सर्व चर्चांदरम्यान  अधिकृत पातळीवर कोणताही प्रस्ताव सादर झाला नसल्याचे समजते.

Virar Rename as Dwarkadhish: नामांतराच्या चर्चेनंतर संतापाची लाट

विरारचे नाव बदलण्याच्या कथित मागणीचे वृत्त समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांसह मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. “विरार हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख असलेले नाव आहे. मग ते बदलण्यामागचा नेमका अजेंडा काय?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर, “शहरांची मूळ ओळख पुसण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” अशा शब्दांत नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Virar Rename as Dwarkadhish: ‘द्वारकाधीश’ नाव चर्चेत येण्यामागचे कारण काय?

विरारमध्ये अलीकडेच गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मागील महिन्यात या मंदिराचे उद्घाटन झाले असून, हे मंदिर वसई-विरार परिसरातील एक नवीन धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर पूर्णपणे पारंपरिक स्थापत्यशैलीत उभारण्यात आले असून, सिमेंट, वाळू किंवा आधुनिक साहित्याचा वापर न करता केवळ कोरलेल्या दगडांच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे. याच मंदिराच्या पार्श्वभूमीवर विरारचे नाव बदलून ‘द्वारकाधीश’ करण्याची मागणी पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या मागणीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असून, हा विषय आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. www.mumbaiawaaz.asia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *