पालघर रेल्वे स्टेशन (वेस्ट) परिसरात रस्त्याच्या कडेला फेरीवाले, भाजी-पाला व मासे विक्रेते बसत असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या निर्माण होत आहे.

पालघर नागरिक अपडेट | जाग महाराष्ट्र.

दिनांक : 9 जानेवारी 2026
पालघर : अर्पिता तिवारी.

पालघर रेल्वे स्टेशन (वेस्ट) परिसरात रस्त्याच्या कडेला फेरीवाले, भाजी-पाला व मासे विक्रेते बसत असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या निर्माण होत आहे.

रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने रिक्षा व इतर वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक रिक्षाचालक व नागरिकांनी अनेक वेळा या फेरीवाल्यांना “मार्केटमध्ये बसा” अशी विनंती केली आहे. मात्र, वारंवार सांगूनही काही विक्रेते ऐकत नाहीत. पोलीस प्रशासनाने सूचना दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही.

हीच समस्या मनोर रोडवरही रोज पाहायला मिळते. रस्त्याच्या मधोमध मासे विक्री सुरू असते, तर ग्राहक आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करून खरेदी करतात. परिणामी संपूर्ण रस्ता अडतो आणि काही वेळातच मोठा ट्राफिक जाम निर्माण होतो. ही समस्या रोजची असून नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले आहेत.

पालघरची लोकसंख्या वाढली आहे, वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. रस्ते मोकळे ठेवणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, नगरपरिषदेकडून या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पालघर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून
☑️ फेरीवाल्यांसाठी निश्चित जागा उपलब्ध करणे,

☑️ रस्त्यावर बसणाऱ्यांवर कडक कारवाई करणे,

☑️वाहतूक अडवणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे,
अशी ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.
जनता त्रस्त आहे, पण ऐकणारा कोणीच नाही, अशी भावना आज पालघरकर व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *