पालघर, दि. १३ जानेवारी २०२६
रिपोर्टर : अर्पिता तिवारी.
३७ वे रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यामुळे दुचाकीस्वारांना मांजापासून होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन वाहतूक शाखा, पालघर यांच्या वतीने विशेष जनजागृती व संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या..
सदर मोहीम मा. पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतीश देशमुख साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे साहेब, मा. पोलीस उपअधीक्षक श्री. रविंद्र नाईक साहेब तसेच वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

या मोहिमेत पालघर शहरातील दुचाकीस्वारांना गळ्यात घालण्यासाठी मांजापासून संरक्षण देणाऱ्या सुरक्षा पट्ट्या देण्यात आल्या, तसेच हेल्मेटचे वितरण करून वाहतूक नियमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांची सुरक्षितता राखणे व संभाव्य जीवितहानी टाळणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वाहतूक शाखा, पालघर विभागाकडून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून, सण-उत्सवांच्या काळात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर उपक्रमाची फोटो व व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असून, रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पालघर पोलिसांचा हा उपक्रम नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
✍️ माहितीस्तव सविनय सादर
पंढरीनाथ कराटे
पोलीस उपनिरीक्षक
वाहतूक शाखा, पालघर..



