पालघर / अर्पिता तिवारी.
भा.ज.पा. प्रणीत नवभारतीय शिववाहतुक संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेत जावेद लुलानिया यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर जावेद लुलानिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी संघटनेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतला, त्यामुळे संघटनेची ताकद जिल्ह्यात लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
या प्रसंगी जावेद लुलानिया यांनी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी माननीय हाजी आराफ़त शेख यांचे आभार मानताना सांगितले की, “माननीय हाजी आराफ़त शेख यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. इंशाअल्लाह, या विश्वासास पात्र ठरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन.” तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली व विचारधारेतून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील वाहनचालकांच्या समस्या, रस्ता सुरक्षा, वाहतूक विषयक प्रश्न तसेच संघटनेचा विस्तार यासाठी ठोस कार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जावेद लुलानिया यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.



